Thursday, May 3, 2012


खळखळून हसलो नाही, मनमुराद रडलो नाही;
मी मनाप्रमाणे माझ्या केव्हाही जगलो नाही!
का माझ्यावरती कोणी ना उडवावे शिंतोडे?
नखशिखांत बदनामीने मी अजून भिजलो नाही!
ना कळे अशा मी कुठल्या मातीचा बनलो होतो;
मी कुठेच रुळलो नाही, मी कुठेच रुजलो नाही!
दररोज दिले दुनियेने दु:खांचे नवीन भारे;
दुनियाही दमली नाही, अन् मीही झुकलो नाही!
स्वाक्षरी बरोबर होती, तारीख बरोबर होती;
मी धनादेश खात्रीचा अन् अजून वटलो नाही!
ऎकून दाद जनतेची मज गझल म्हणाली माझी....
मी हृदयावरून गेलो, हृदयाला भिडलो नाही!
हृदयात जरी स्वप्नांचे पेटते निखारे होते;
मी धुमसत धुमसत जगलो, दिलखुलास फुललो नाही!

Tuesday, June 28, 2011

सहज नाही सुचलं

चंद्र वरी आला, सूर्याचा अलविदा झाला
वाहे शांत वारा, क्रम रोजचाच झाला
तुझं मात्र हल्ली गणित चुकलंय
मी वाट बघतोय

ठिकाणालाही अता हे कळलंय
तेही बुचकळ्यात पडलंय
ते गवत बसलंय रुसून
तिथे नाहीत तुझी पावलं सजून
त्या दगडाची झालीये चुळबुळ सुरु
त्यावर कुणी टेकलं नाही अजून
वाऱ्यालाही त्या लागलेत वेध
खेळायला मिळाले नाहीत अजून तुझे केस
पिवळी फुलं आलीयेत खुलून
त्यांच्याकडे लक्ष जातंय म्हणून

ही वाटही अता लाजतीये भारी
त्यावर नाही आली अजून तुझी स्वारी
म्हणे माझ्या कडे पाहशील किती
भाव अता असा मला देशील किती
आली ती कि हा माझा राहणार नाही थाट
दाखवशील बघ तेंव्हा मलाच वाट

नाही नाही तू असं बोलूनकोस आज
माझ्या सारख्यांना असते अखेर तुझीचतर साथ